Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 6:06

[1] मग असे झाले की शास्ते राज्य करत असता त्या देशात दुष्काळ पडला आणि यहूदातील बेथलेहेम नगरातील कोणी एक मनुष्य आपली पत्नी व दोन पुत्रांसह मवाब देशी गेला.

[2] त्या मनुष्याचे नाव अलीमलेख व त्याच्या पत्नीचे नाव नामी होते, आणि त्याच्या दोन पुत्रांची नावे महलोन व खिल्लोन होते. ते एफ्राथी म्हणजे यहूदा प्रांतातील बेथलेहेम नगरात होते. ते मवाब देशी राहायला गेले.

[3] नामीचा पती अलीमलेख मरण पावला आणि तिच्या दोन पुत्रांबरोबर ती मागे राहिली.

[4] त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया पत्नी म्हणून केल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ते तेथे जवळपास दहा वर्षे राहिले.

[5] मग महलोन व खिल्लोन मरण पावले. याप्रमाणे नामी आपला पती व दोन पुत्र यांच्यामागे एकटी राहिली.

[6] परमेश्वराने आपल्या लोकांस अन्न पुरविले आहे आणि मदत केली आहे हे तिने ऐकले तेव्हा आपल्या दोन्ही सुनांसह ती मवाब देशातून परत यहूदा देशात जायला निघाली.

[7] ती आपल्या दोन्ही सुनांसह राहत होती त्याठिकाणाहून परत यहूदा देशास जायला निघाली.

[8] नामी आपल्या दोन्ही सुनांना म्हणाली, “तुम्ही दोघी आपआपल्या आईच्या घरी जा. तुम्ही जशी मृतांवर आणि माझ्यावर दया केली तशीच परमेश्वर तुमच्यावर करो.

[9] परमेश्वर करो आणि तुम्हाला दुसऱ्या पतीच्या घरी विसावा मिळो.” मग तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या मोठ्याने रडू लागल्या.

[10] त्या तिला म्हणाल्या, “नाही, आम्ही तुमच्याबरोबर तुमच्या लोकांकडे येणार.”

[11] नामी म्हणाली, “माझ्या मुलींनो, परत जा, तुम्ही माझ्याबरोबर का येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होतील?

[12] माझ्या मुलींनो माघारी जा; मी आता म्हातारी झाले आहे, पती करण्याचे माझे वय नाही. जर मला पती मिळण्याची आशा आहे असे मी म्हटले तरी व आज रात्रीच तो मिळाला आणि जरी मला पुत्रही झाले,

[13] तरी ते मोठे होईपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल का? तुम्ही आता लग्न न करता पतीशिवाय रहाल का आणि त्याची वाट पहाल का? माझ्या मुलींनो, तुम्हाला होणाऱ्या दुःखासाठी मी फार दुःखी होत आहे, कारण परमेश्वराचा हात माझ्याविरुद्ध फिरला आहे.”

[14] मग तिच्या सुना मोठा आवाज काढून पुन्हा रडू लागल्या. अर्पाने आपल्या सासूचे चुंबन घेतले, पण रूथ तिच्या जवळ राहिली.

[15] ती तिला म्हणाली, “ऐक, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवांकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा.”

[16] रूथ म्हणाली, “मला सोडून जा आणि माझ्यापासून दूर जा असे मला सांगू नका; तुम्ही जिथे जाल तिथे मी येईन, तुम्ही जिथे रहाल तिथे मी राहीन आणि तुमचे लोक ते माझे लोक व तुमचा देव तो माझा देव.

[17] तुम्ही मराल तेथे मी मरेन व तिथेच मला पुरले जाईल. मरणाशिवाय कशानेही तुमचा माझा वियोग झाला तर परमेश्वर मला शिक्षा करो किंवा त्यापेक्षा अधिक करो.”

[18] रूथने आपल्याबरोबर जाण्याचा दृढनिश्चय केला आहे हे नामीने पाहिले तेव्हा तिने तिच्यासोबत वादविवाद करण्याचे थांबवले.

[19] मग त्या दोघी बेथलेहेमात पोहचल्या. बेथलेहेमात आल्यावर सर्व नगर त्यांच्यासाठी खूप गलबलून गेले आणि स्त्रिया म्हणू लागल्या, “हीच का ती नामी?”

[20] आणि ती त्यांना म्हणाली, “मला नामी (मनोरमा) म्हणू नका, तर मला मारा (दु:खदायक) म्हणा कारण सर्वसमर्थाने मला फारच क्लेशमय वागवले आहे.

[21] मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले, परमेश्वराने माझ्याविरुद्ध साक्ष दिली आहे आणि त्या सर्वसमर्थाने मला दु:खित केले आहे तर तुम्ही मला नामी का म्हणता?”

[22] याप्रमाणे नामी तिची मवाबी सून रूथ हिला घेऊन मवाब देशातून परत आली आणि त्या बेथलेहेम नगरात आल्या तेव्हा सातूच्या हंगामास आरंभ झाला होता.

रूथ — Chapters