Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 8:40

[1] ज्या गोष्टींची आम्हास पक्की खातरी आहे त्या गोष्टी जे प्रारंभापासून प्रत्यक्ष पाहाणारे व शब्दाचे सेवक होते,

[2] त्यांनी त्या जशा आम्हास सोपवून दिल्या त्या तशाच सांगाव्या म्हणून त्यांविषयीचा वृत्तांत अनुक्रमाने लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले आहे.

[3] म्हणून हे थियफिला महाराज, मी सर्व गोष्टींचा मुळापासून चांगला शोध केल्यामुळे मलाही हे बरे वाटले की, या सर्व घटनांविषयीची माहिती आपणाला व्यवस्थित पणे माहिती लिहावी.

[4] यासाठी की ज्या गोष्टींचे शिक्षण आपल्याला मिळाले आहे त्यांचा निश्चितपणा आपण पूर्णपणे जाणावा.

[5] यहूदीया प्रांताचा राजा हेरोद याच्या दिवसात, जखऱ्या नावाचा कोणी याजक होता. तो अबीयाच्या याजक घराण्यातील असून त्याची पत्नी अहरोनाच्या वंशातील होती व तिचे नाव अलीशिबा होते.

[6] ते दोघेही देवापुढे नीतिमान होते आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधीत निर्दोषपणे चालत असत.

[7] परंतु त्यांना मूल नव्हते कारण अलीशिबा वांझ होती, शिवाय ते दोघेही फार म्हातारे झाले होते.

[8] मग असे झाले की, तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे त्याचे याजकाचे काम करत असता,

[9] याजकांच्या रीतीप्रमाणे परमेश्वराच्या भवनात धूप जाळण्यासाठी चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली.

[10] आणि लोकांचा सगळा जमाव धूप जाळण्याच्या वेळेस बाहेर प्रार्थना करीत उभा होता.

[11] तेव्हा परमेश्वराचा दूत, धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला.

[12] त्यास पाहून जखऱ्या भयभीत झाला.

[13] परंतु देवदूत त्यास म्हणाला, जखऱ्या भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझी पत्नी अलीशिबा हिच्याकडून तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव योहान ठेव.

[14] तेव्हा तुला आनंद व उल्लास होईल आणि त्याच्या जन्माने पुष्कळ लोक हर्षित होतील.

[15] कारण तो परमेश्वराच्या दृष्टीने महान होईल आणि तो द्राक्षरस किंवा मद्य कधीच पिणार नाही व तो आईच्या गर्भात असतांनाच पवित्र आत्म्याने भरलेला असेल.

[16] तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना, प्रभू त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल.

[17] आणि देवासाठी सिद्ध झालेले असे लोक तयार करायला, वडिलांची अंतःकरणे मुलांकडे आणि आज्ञा न मानणार्‍यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी तयार केलेली प्रजा उभी करावयाला तो एलीयाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्यांच्यापुढे चालेल.

[18] मग जखऱ्या देवदूताला म्हणाला, “हे घडणारच असे मी कशावरुन समजू? कारण मी वृद्ध मनुष्य आहे आणि माझी पत्नीसुद्धा उतारवयात आहे.”

[19] देवदूताने त्यास उत्तर दिले, “मी देवाच्या पुढे उभा राहणारा गब्रीएल आहे आणि तुझ्याशी बोलायला व तुलाही सुवार्ता सांगायला मला पाठविण्यात आले आहे.

[20] पाहा, हे घडेपर्यंत तुला बोलता येणार नाही व तू मुका राहशील कारण माझे शब्द जे योग्यवेळी पूर्णपणे खरे ठरणार आहेत त्या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाहीस.”

[21] तेव्हा जखऱ्याची वाट पाहणाऱ्या लोकांस तो परमेश्वराच्या भवनात इतका वेळ का राहिला याचे आश्चर्य वाटले.

[22] तो बाहेर आल्यावर त्यास त्यांच्याबरोबर बोलता येईना. तेव्हा त्यांना जाणिव झाली की, परमेश्वराच्या भवनात त्याने दृष्टांत पाहिला आहे. तो त्यांना खुणा करत होता परंतु तो तसाच मुका राहीला.

[23] मग असे झाले की त्याच्या सेवेचा कालावधी पूर्ण झाल्यावर तो घरी परत गेला.

[24] त्या दिवसानंतर त्याची पत्नी अलीशिबा गरोदर राहिली व पाच महिने लपून राहिली, ती म्हणाली,

[25] लोकांमध्ये माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले तेव्हा त्याने माझ्यासाठी असे केले.

[26] अलीशिबेच्या गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात देवाने गब्रीएल दूताला गालील प्रांतातील नासरेथ नावाच्या गावी,

[27] एका कुमारीकडे पाठवले. तिची दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या मनुष्याशी मागणी झाली होती आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते.

[28] देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, अभिवादन! तुझ्यावर कृपा झालेली आहे. प्रभू तुझ्याबरोबर आहे.

[29] परंतु ती त्याच्या शब्दाने अस्वस्थ झाली आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करू लागली.

[30] देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे.

[31] पाहा! तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू येशू ठेव.

[32] तो महान होईल व त्यास थोर देवाचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्यास त्याचा पिता दावीद याचे राजासन देईल.

[33] तो याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी राज्य चालवील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.”

[34] तेव्हा मरीया दूताला म्हणाली, हे कसे होईल? कारण मला पुरूष ठाऊक नाही.

[35] देवदूत तिला म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि थोर देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्यास देवाचा पुत्र म्हणतील.

[36] बघ, तुझी नातेवाईक अलीशिबा ही सुद्धा म्हातारपणात गरोदर असून तिला पुत्रगर्भ राहीला आहे आणि जिला वांझ म्हणले जाई तिला आता सहावा महिना आहे.

[37] कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

[38] मरीया म्हणाली, खरोखर “मी प्रभूची दासी आहे, आपल्या म्हणण्याप्रमाणे मला होवो.” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.

[39] त्या दिवसात मरीया उठली आणि घाईने यहूदीया प्रांताच्या डोंगराळ भागातील एका नगरात गेली.

[40] तिने जखऱ्याच्या घरात प्रवेश केला आणि अलीशिबेला अभिवादन केले.

[41] जसे मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले तिच्या उदरातील बाळाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने भरली.

[42] ती उंच स्वर काढून मोठ्याने म्हणाली, “स्त्रियांमध्ये तू धन्यवादित आहेस आणि तुझ्या पोटचे फळ धन्य आहे.

[43] माझ्या प्रभूच्या मातेने मजकडे यावे हा मान मला कोठून?”

[44] जेव्हा तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडली, तेव्हा माझ्या उदरातील बाळाने आनंदाने उडी मारली

[45] जिने विश्वास ठेवला ती धन्य आहे, कारण ज्या गोष्टी प्रभूने तिला सांगितल्या त्याची पूर्णता होईल?

[46] मरीया म्हणाली, “माझा जीव प्रभूला थोर मानतो,

[47] आणि देव जो माझा तारणारा याच्या ठायी माझा आत्मा आनंदीत झाला आहे.

[48] कारण त्याने आपल्या दासीची दैन्य अवस्था पाहीली. आतापासून मला सर्व पिढ्या धन्य म्हणतील.

[49] कारण जो सर्वसमर्थ आहे त्याने माझ्यासाठी मोठी कामे केली आहेत; आणि त्याचे नाव पवित्र आहे.

[50] जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे

[51] त्याने त्याच्या हाताने सामर्थ्याची कार्ये केली आहेत; जे गर्विष्ठ अंतःकरणाचे आहेत त्यांची त्याने पांगापांग केली आहे.

[52] त्याने राज्य करणाऱ्यांना त्यांच्या राजासनांवरून ओढून काढले आहे आणि गरीबास उंचावले आहे.

[53] त्याने भूकेल्यास चांगल्या पदार्थांने तृप्त केले आहे. आणि धनवानास रिकाम्या हाताने परत पाठवले आहे.

[54] दयेपोटी त्याने आपला सेवक इस्राएल याला साहाय्य केले आहे.

[55] आपल्या पूर्वजास त्याने सांगितल्याप्रमाणे अब्राहाम व त्याचे संतान यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरण करावी. त्याने आपला सेवक इस्राएल याला साहाय्य केले आहे.”

[56] अलीशिबेबरोबर तीन महीने राहिल्यानंतर मरीया आपल्या घरी परत गेली.

[57] अलीशिबेची प्रसूतीची वेळ आल्यावर, तिने एका मुलास जन्म दिला.

[58] प्रभूने तिच्यावर मोठी दया केली आहे, हे तिच्या शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी ऐकले आणि ते तिच्या आनंदात सहभागी झाले.

[59] मग असे झाले की, आठव्या दिवशी मुलाची सुंता करण्यासाठी ते आले असता, त्याच्या पित्याच्या नावाप्रमाणे ते बाळाचे नाव देखील जखऱ्या ठेवणार होते.

[60] परंतु त्याच्या आईने उत्तर दिले, नाही त्याऐवजी त्याचे नाव योहान ठेवायचे आहे.

[61] ते तिला म्हणाले, तुझ्या नातलगात या नावाचा कोणीच नाही.

[62] नंतर त्यांनी त्याच्या वडिलांना हातवारे करून विचारले, याचे नाव काय ठेवावे, अशी तुझी इच्छा आहे

[63] तेव्हा त्याने लिहिण्यासाठी पाटी मागितली आणि, त्याचे नाव योहान आहे, असे लिहीले यावरुन त्या सर्वांना खूपच आश्चर्य वाटले.

[64] त्याच क्षणी त्याचे तोंड उघडले व त्याची जीभ मोकळी झाली आणि तो बोलू लागला व देवाला धन्यवाद देऊ लागला.

[65] तेव्हा सर्व शेजारी भयभीत झाले आणि यहूदीया प्रांताच्या सर्व डोंगराळ प्रदेशात लोक या सर्व गोष्टींबद्दल बोलू लागले.

[66] जे कोणी हे ऐकले ते प्रत्येकजण मनात विचार करत होते, ते म्हणाले, हे मूल पुढे कोण होणार आहे? प्रभू त्याच्याबरोबर आहे असे त्यांच्या लक्षात आले.

[67] त्याचा पिता जखऱ्या पवित्र आत्म्याने भरला आणि त्यानेही भविष्यवाणी केली; तो म्हणाला,

[68] “इस्राएलाचा देव प्रभू, ह्याची स्तुती असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेतली आणि लोकांची खंडणी भरून सुटका केली.

[69] त्याने आपला सेवक दावीद याच्या घराण्यातून आमच्यासाठी सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे.

[70] हे देवाने त्याच्या पवित्र संदेष्ट्यांद्वारे युगाच्या प्रारंभापासून सांगितले होते.

[71] जे आमचे शत्रू आहेत व जे आमचा द्वेष करतात त्यांच्यापासून सुटका करण्याचे अभिवचन त्याने आम्हास दिले.

[72] आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे व आपल्या पवित्र कराराची आठवण ठेवणार आहे,

[73] हा करार एक शपथ होती जी त्याने आमचा पूर्वज अब्राहामाला वाहिली.

[74] ती अशी की, तुम्ही आपल्या शत्रूच्या हातातून सोडवले जाऊन,

[75] माझ्यासमोर पवित्रतेने व नीतिमत्त्वाने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन.

[76] हे बालका, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरीता तू त्यांच्यापुढे चालशील.

[77] यासाठी की, त्याच्या लोकांस त्यांच्या पापांच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा.

[78] देवाच्या दयेमुळे स्वर्गीय दिवसाची पहाट उजाडेल व मरणाच्या दाट छायेत जे जगत आहेत त्यांच्यावर प्रकाशेल.

[79] तिच्याकडून जे अंधारात आहेत व मृत्युच्या छायेत बसले आहेत त्यांना प्रकाश देण्यासाठी आणि आमचे पाय शांतीच्या मार्गास लावण्यासाठी दिवसाचा उदय करून आमची भेट घेईल.”

[80] मग तो मुलगा वाढत गेला आणि आत्म्यात सामर्थ्यशाली झाला. इस्राएल लोकांस प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला.

लूककृत शुभवर्तमान — Chapters