Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 3:43

[1] याकोब, देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक, याजकडून, जगभर पांगलेल्या, विश्वास ठेवणाऱ्या बारा यहूदी वंशांना नमस्कार.

[2] माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना.

[3] तुम्हास माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे सहनशीलता निर्माण होते.

[4] आणि त्या सहनशीलतेला आपले कार्य पूर्ण करू द्या. यासाठी की तुम्ही प्रौढ, परिपूर्ण व कोणत्याही बाबतीत कमतरता नसलेले असे पूर्ण व्हावे.

[5] म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाकडे मागावे म्हणजे ते त्यास मिळेल कारण तो दोष न लावता सर्वांस उदारपणे देतो.

[6] पण त्याने विश्वासाने मागावे व संशय धरू नये कारण जो संशय धरतो तो वाऱ्यामुळे लोटलेल्या व उचबंळलेल्या समुद्रातील लाटेसारखा आहे.

[7] अशा मनुष्यांने असा विचार करू नये की, प्रभूपासून त्यास काही प्राप्त होईल.

[8] कारण तो द्विमनाचा असून तो सर्व मार्गात अस्थिर असतो.

[9] दीन असलेल्या बंधूने, आपल्या उच्चपणाविषयी अभिमान बाळगावा.

[10] आणि श्रीमंत बंधूने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा कारण तो एखाद्या गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल.

[11] सूर्य त्याच्या तीव्र तेजाने उगवला आणि त्याने गवत कोमजवले. मग त्याचे फुल गळून पडले व त्याच्या रुपाची शोभा नाहीशी झाली. त्याचप्रमाणे श्रीमंत मनुष्यदेखील त्याच्या उद्योगात भरात कोमेजून जाईल.

[12] जो परीक्षा सोसतो तो धन्य आहे कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा मुकुट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांस देऊ केला आहे तो त्यास मिळेल.

[13] कोणाची परिक्षा होत असता, तेव्हा त्याने असे म्हणू नये की “देवाने मला मोहात घातले.” कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह पडणार नाही आणि तो कोणालाही मोहात पाडत नाही.

[14] तर प्रत्येकजण त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार मोहात पडतो व भुलवला जातो.

[15] मग इच्छा गर्भवती होऊन पापाला जन्म देते व पापाची पूर्ण वाढ झाल्यावर मरणाला उपजवते.

[16] माझ्या प्रिय बंधूंनो, स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका.

[17] प्रत्येक उत्तम दान व परिपूर्ण देणगी देवाकडून आहे. जो बदलत नाही व फिरण्याने छायेत नाही अशा स्वर्गीय प्रकाश असणाऱ्या पित्यापासून ते उतरते.

[18] आपण त्याच्या निर्मीती मधील जसे काय प्रथमफळ व्हावे म्हणून त्याने सत्यवचनाद्वारे स्वतःच्या इच्छेने आपणाला जन्म दिला.

[19] माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागास मंद असावा.

[20] कारण मनुष्याच्या रागामुळे देवाचे नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही.

[21] म्हणून तुमच्यासभोवतीच्या सर्व अमंगळ गोष्टींपासून पूर्णपणे स्वतःची सुटका करून घ्या आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंतःकरणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्वीकारा.

[22] वचनाप्रमाणे आचरण करणारे असा व फक्त ऐकणारेच असू नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता.

[23] जो कोणी देवाचे वचन ऐकतो परंतु त्यानुसार वागत नाही, तो आरशामध्ये आपले शारीरिक तोंड पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे.

[24] तो मनुष्य स्वतःकडे लक्षपूर्वक पाहतो. नंतर निघून जातो आणि आपण कसे होतो ते लगेच विसरून जातो.

[25] परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचे बारकाईने पालन करतो आणि वचन ऐकून ते विसरून न जाता त्यानुसार चालतो, तो मनुष्य जे काही करतो त्यामध्ये आशीर्वादित होईल.

[26] जर एखादा मनुष्य स्वतःला धार्मिक समजतो आणि तरी स्वतःच्या जीभेवर ताबा ठेवत नाही, तर तो स्वतःच्या अंतःकरणाला फसवतो. त्या व्यक्तीची धार्मिकता निरर्थक आहे.

[27] अनाथ व विधवा यांच्या संकटात जो त्यांची काळजी घेतो व स्वतःला जगातील बिघडलेल्या वातावरणापासून दूर ठेवतो, अशा मनुष्याची धार्मिकता देवासमोर शुद्ध व निर्दोष ठरते.

याकोबाचे पत्र — Chapters