[1] मुलांनो, प्रभूमध्ये आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे योग्य आहे.
[2] “आपल्या वडिलांचा व आईचा मान राख, यासाठी की तुझे सर्वकाही चांगले व्हावे व तुला पृथ्वीवर दीर्घ आयुष्य लाभावे.” अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे.
[4] आणि वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका पण तुम्ही त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.
[5] दासांनो, तुमच्या अंतःकरणाच्या प्रामाणिकतेने जशी ख्रिस्ताची आज्ञा पाळता तशी पूर्ण आदराने व थरथर कांपत जे देहानुसार पृथ्वीवरील मालकांशी आज्ञाधारक असा.
[6] मनुष्यास संतोषवणाऱ्या सारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे तर मनापासून, देवाची इच्छा साधणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे आज्ञांकित असा,
[7] ही सेवा मनुष्याची नाही तर प्रभूची सेवा आहे अशी मानून ती आनंदाने करा,
[8] प्रत्येक व्यक्ती जे काही चांगले कार्य करतो, तो दास असो अथवा स्वतंत्र असो, प्रभूकडून त्यास प्रतिफळ प्राप्त होईल.
[9] आणि मालकांनो तुम्ही, त्यांना न धमकावता, तुमच्या दासाशी तसेच वागा, तुम्हास हे ठाऊक आहे की, दोघाचाही मालक स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.
[10] शेवटी, प्रभूमध्ये बलवान होत जा आणि त्याच्या सामर्थ्याने सशक्त व्हा.
[11] सैतानाच्या कट-कारस्थानी योजनांविरुद्ध उभे राहता यावे, म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा.
[12] कारण आपले झगडणे रक्त आणि मांसाबरोबर नाही, तर सत्ताधीशांविरुद्ध, अधिकाऱ्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या अधिपतीबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्याविरुद्ध आहे.
[13] या कारणास्तव वाईट दिवसात तुम्हास प्रतिकार करता यावा म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्त्रसामग्री घ्या. म्हणजे तुम्हास सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल
[14] तर मग स्थिर उभे राहा, सत्याने आपली कंबर बांधा, नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा.
[15] शांतीच्या सुवार्तेसाठी तयार केलेल्या वहाणा पायात घाला.
[16] नेहमी विश्वासाची ढाल हाती घ्या, जिच्यायोगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवू शकाल, ती हाती घेऊन उभे राहा.
[17] आणि तारणाचे शिरस्राण व आत्म्याची तलवार, जी देवाच वचन आहे, ती घ्या,
[18] प्रत्येक प्रार्थना आणि विनंतीद्वारे सर्व प्रसंगी आत्म्यात प्रार्थना करा आणि चिकाटीने उत्तराची वाट पाहा व सर्व पवित्र जनांसाठी प्रार्थना करीत जागृत राहा.
[19] आणि माझ्यासाठी प्रार्थना करा, जेव्हा मी तोंड उघडीन तेव्हा मला धैर्याने सुवार्तेचे रहस्य कळवण्यास शब्द मिळावे,
[20] मी, त्यासाठीच बेड्यांत पडलेला वकील आहे, म्हणजे मला जसे त्याविषयी बोलले पाहिजे तसे धैर्याने बोलता यावे.
[21] पण माझ्याविषयी, म्हणजे मी काम करीत आहे ते तुम्हास समजावे म्हणून, प्रिय बंधू आणि प्रभूमधील विश्वासू सेवक तुखिक या सर्व गोष्टी तुम्हास कळवील.
[22] मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे धाडले आहे; म्हणजे तुम्हास माझ्याविषयी कळावे आणि त्याने तुमच्या मनाचे सांत्वन करावे.
[23] देवपिता आणि प्रभू येशू ख्रिस्तापासून आता बंधूंना विश्वासासह प्रीती आणि शांती लाभो.
[24] जे सर्वजण आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर अविनाशी प्रीती करतात, त्या सर्वाबरोबर देवाची कृपा असो.