[1] तेव्हा काही जणानी यहूदीयाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की, मोशेने लावून दिलेल्या नियमाप्रमाणे तुमची सुंता झाल्याशिवाय तुमचे तारण होणे शक्य नाही.
[2] तेव्हा पौल व बर्णबा ह्यांचा त्यांच्याशी बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरविण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी व त्यांच्यापैकी इतर लोकांनी या वादाविषयी यरूशलेम शहरामधील प्रेषित व वडील ह्यांच्याकडे जावे.
[3] मग मंडळीने त्यांना पाठवल्यावर ते फेनीके व शोमरोन या शहरामधून गेले आणि परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले.
[4] नंतर ते यरूशलेम शहरास आल्यावर तेथील मंडळी, प्रेषित व वडील ह्यांनी त्यांचे आगतस्वागत केले, तेव्हा आपण देवाच्या सहवासांत असतांना त्याने जे जे केले ते त्यांनी सांगितले.
[5] तरीही परूशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे असे म्हणाले, त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळावयाची त्यांना आज्ञा केलीच पाहीजे.
[6] मग प्रेषित व वडीलवर्ग या प्रकरणाचा विचार करावयास जमले.
[7] तेव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला बंधुजनहो, तुम्हास ठाऊक आहे की, माझ्या तोडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीचा दिवसांपासून तुम्हामध्ये देवाने माझी निवड केली.
[8] आणि हृदये जाणणाऱ्या देवाने जसा आपणास तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली.
[9] त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही.
[10] असे असतांना जे जोखड आपले पूर्वज व आपण वाहावयास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालू तुम्ही देवाची परीक्षा का पाहता?
[11] तर मग त्यांच्याप्रमाणेच आपले तारण प्रभू येशूच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे.
[12] तेव्हा सर्व लोक गप्प राहीले आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या द्वारे देवाने परराष्ट्रीयामध्ये जी चिन्हे व अद्भूते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले.
[13] मग त्यांचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला; बंधुजनहो, माझे ऐका.
[14] परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली, हे शिमोनाने सांगितले आहे; आणि ह्याच्याशी संदेष्ट्यांच्या उक्तीचाही मेळ बसतो, असा शास्त्रलेख आहे की,
[16] ह्यानंतर मी परत येईन व दावीदाचा पडलेला मंडप पुन्हा उभारीन; आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन,
[17] ह्यासाठी की, शेष राहिलेल्या मनुष्यांनी व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा.
[18] हे जे त्यास युगादीपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो.
[19] तेव्हा माझे तर मत असे आहे की, जे परराष्ट्रीयांतून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये;
[20] तर त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तीचे अमगंळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्याच्यापासून तुम्ही अलिप्त असा.
[21] कारण प्राचीन काळापासून प्रत्येक शब्बाथ दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरांत आहेत.
[22] तेव्हा पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणातून निवडलेली माणसे म्हणजे बंधुजनांतील प्रमुख बर्शब्बा म्हटलेला यहूदा व सीला ह्यांना अंत्युखियास पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील ह्यांना वाटले.
[23] त्यांच्या हाती त्यांनी असे लिहून पाठवलेः “अंत्युखिया, सिरीया व किलकिया येथील परराष्ट्रीयांतले बंधुजन ह्यांना प्रेषित व वडीलवर्ग या बंधुजनांचा सलाम.
[24] आमच्यापैकी काहींना जाऊन आपल्या बोलण्याने तुमचे जीव घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे; पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते.
[25] म्हणून आमचे एकमत झाल्यावर आम्हास हे योग्य वाटले की,
[26] आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरिता जीवावर उदार झालेले आपले प्रिय बंधू बर्णबा व पौल ह्यांच्याबरोबर काही निवडलेले माणसे तुम्हाकडे पाठवावी.
[27] ह्याकरिता यहूदा व सीला ह्यांना आम्ही पाठवले आहे ते स्वतः या गोष्टी तुम्हास तोंडी सांगतील.
[28] कारण पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टीशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हास योग्य वाटले:
[29] त्या म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी; ह्यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल, क्षेमकुशल असो.”
[30] त्यांना पाठवून दिल्यावर ते अंत्युखियास गेले आणि त्यांनी सर्व मंडळीला जमवून ते पत्र सादर केले.
[31] त्यातला बोध वाचून त्यांना आनंद झाला.
[32] यहूदा व सीला हे स्वतः संदेष्टे होते, म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले.
[33] तेथे ते काही दिवस राहील्यावर ज्यांनी त्यांना पाठवले होते त्यांच्याकडे जाण्यास बंधुजनांनी त्यांना शांतीने पाठवून दिले.
[34] परंतु सिलाला तेथे आणखी रहावयास बरे वाटले.
[35] आणि पौल व बर्णबा इतर पुष्कळ जणांबरोबर प्रभूचे वचन शिकवीत व सुवार्तेची घोषणा करीत अंत्युखियास राहीले.
[36] मग काही दिवसानंतर पौलाने बर्णबाला म्हणले “ज्या ज्या नगरात आपण प्रभूच्या वचनांची घोषणा केली तेथे पुन्हा जाऊन बंधुजनांना भेटून ते कसे आहेत हे पाहू या.”
[37] बर्णबाची इच्छा होती की, ज्याला मार्क म्हणत त्या योहानाला बरोबर घ्यावे.
[38] परंतु पौलाला वाटले की, पंफुलियाहून जो आपणाला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम करावयास आला नाही त्यास सोबतील घेणे योग्य नाही.
[39] ह्यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्णबा मार्काला घेऊन तारवात बसून कुप्रास गेला;
[40] पौलाने सीलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्यास प्रभूच्या कृपेवर सोपविल्यावर तो तेथून निघाला.
[41] आणि मंडळयाना स्थैर्य देत सिरीया व किलिकिया ह्यामधुन गेला.