Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:31

[1] आम्ही पुन्हा आमची स्वतःची प्रशंसा करू लागलो आहोत काय? किंवा आम्हास, दुसर्‍यांप्रमाणे, तुमच्याकरिता किंवा तुमच्याकडून शिफारसपत्रांची गरज आहे काय?

[2] तुम्ही स्वतःच आमची शिफारसपत्रे आहात; आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, प्रत्येकाने वाचलेले व प्रत्येकाला माहीत असलेले.

[3] शाईने नव्हे, तर जिवंत देवाच्या आत्म्याने कोरलेले दगडी पाट्यांवर नव्हे, तर मानवी मांसमय हृदयाच्या पाट्यांवर कोरलेले, आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र आहात, असे तुम्ही दाखवून देता.

[4] आणि ख्रिस्तामुळे देवाच्या ठायी आमचा असा विश्वास आहे.

[5] आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरविण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे.

[6] त्याने आम्हास नव्या कराराचे सेवक होण्यास पात्र केले. तो लेखाद्वारे केलेला नाही, पण पवित्र आत्म्याद्वारे केलेला आहे कारण लेख मारून टाकतो पण पवित्र आत्मा जिवंत करतो.

[7] पण दगडावर कोरलेल्या अक्षरात लिहिलेली मरणाची सेवा इतकी गौरवी झाली की, इस्राएल लोक मोशेच्या तोंडावरील तेज, जे नाहीसे होत चालले होते, त्या तेजामुळे त्याच्या तोंडाकडे दृष्टी लाववत नव्हती.

[8] तर तिच्यापेक्षा पवित्र आत्म्याची सेवा अधिक गौरवयुक्त कशी होणार नाही?

[9] कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती तिच्यापेक्षा किती विशेषकरून अधिक तेजोमय असणार.

[10] इतकेच नव्हे, तर “जे तेजस्वी होते ते” या तुलनेने हीनदीन ठरले.

[11] कारण जे नाहीसे होणार होते ते जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार.

[12] तर मग आम्हास अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो.

[13] आम्ही मोशेप्रमाणे करीत नाही; त्याने तोंडावर आच्छादन घातले ते ह्यासाठी की, जे नाहीसे होत चालले होते ते इस्राएल लोकांस शेवटपर्यंत बघता येऊ नये.

[14] पण त्यांची मने कठीण केली गेली कारण आजवर ते आच्छादन, तसेच जुन्या कराराच्या वाचनात, न काढलेले राहिले आहे; ते ख्रिस्तात नाहीसे झाले आहे.

[15] पण आजपर्यंत ते आच्छादन, ते मोशेचे ग्रंथ वाचन करीत असता, त्यांच्या मनावर घातलेले असते.

[16] पण ते जेव्हा प्रभूकडे वळेल तेव्हा ते आच्छादन काढले जाईल.

[17] आणि प्रभू आत्मा आहे व जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे.

[18] पण आपल्या तोंडावर आच्छादन नसून आपण सर्वजण, जणू आरशात पाहिल्याप्रमाणे, प्रभूच्या तेजाकडे पाहत असता, कलेकलेने त्याच्या प्रतिरूपात आपले रूपांतर होत आहे. हे प्रभूच्या आत्म्याकडून होत आहे.

करिंथकरांस दुसरे पत्र — Chapters