Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:27

[1] बंधूनो, शेवटी आम्ही तुम्हास विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की, कोणत्या वागणूकीने देवाला संतोषवावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहा, त्यामध्ये तुमची अधिकाधिक वाढ व्हावी.

[2] कारण प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हास दिल्या त्या तुम्हास ठाऊक आहेत.

[3] कारण देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून दूर रहावे

[4] आणि तुमच्यातील प्रत्येकाला समजावे की, ज्याने त्याने आपल्या देहाला पवित्रतेने व आदरबुद्धीने आपल्या स्वाधीन कसे करून घ्यावे.

[5] देवाला न ओळखऱ्या परराष्ट्रीयांप्रमाणे वासनेच्या लोभाने करू नये.

[6] कोणी या गोष्टींचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये कारण प्रभू या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे; हे आम्ही तुम्हास आधीच सांगितले होते व बजावलेही होते.

[7] कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रेतेसाठी पाचारण केले आहे.

[8] म्हणून जो कोणी नाकार करतो तो मनुष्याचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा देव याचा नाकार करतो.

[9] बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हास लिहावे याची तुम्हास गरज नाही; कारण एकमेकांवर प्रीती करावी, असे तुम्हास देवानेच शिकविले आहे;

[10] आणि अखिल मासेदोनियांतील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करीतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की, ती अधिकाधिक करावी.

[11] आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे शांतीने राहा. आपआपला व्यवसाय करणे आणि आपल्या हातांनी काम करणे याची आवड तुम्हास असावी.

[12] बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हास कशाचीही गरज पडू नये.

[13] पण बंधूंनो, मी इच्छीत नाही की, जे मरण पावलेत त्यांच्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे, म्हणजे ज्यांना आशा नाही अशा इतरांप्रमाणे तुम्ही दुःख करू नये.

[14] कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपण विश्वास ठेवतो, तर येशूमध्ये जे मरतात त्यांनाही देव त्याच्याबरोबर आणील.

[15] कारण प्रभूच्या वचनावरून आम्ही तुम्हास हे सांगतो की, आपण जे जिवंत आहोत व जे प्रभूच्या येण्यापर्यंत मागे राहू, ते आपण तोपर्यंत मरण पावलेल्यांच्या पुढे जाणार नाही.

[16] कारण आज्ञा करणाऱ्या गर्जणेने, आद्यदेवदूतांची वाणी आणि देवाच्या कर्ण्याचा आवाज येईल, तेव्हा प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तात मरण पावलेले प्रथम उठतील.

[17] मग आपण जे जिवंत आहोत व मागे राहू, ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी ढगात उचलले जाऊ आणि सर्वकाळ प्रभूबरोबर राहू.

[18] म्हणून तुम्ही या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.

थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र — Chapters