Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 1:53

[1] जे आरंभापासून होते, ते आम्ही ऐकले आहे, आमच्या डोळ्यांनी आम्ही जे पाहिले आणि न्याहाळले आहे, जे आमच्या हातांनी हाताळले त्याच जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो.

[2] ते जीवन आम्हास प्रकट झाले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो आणि आम्ही त्या सार्वकालिक जीवनाविषयी तुम्हास घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याजवळ होते आणि ते आम्हास प्रकट केले गेले.

[3] आम्ही जे पाहिले व ऐकले आहे ते आम्ही आता तुम्हांलाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीही आमच्यासोबत सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे.

[4] तुमचा-आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही या गोष्टी तुम्हास लिहितो.

[5] जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तोच आम्ही तुम्हास सांगत आहोत, देव प्रकाश आहे आणि त्याच्याठायी मुळीच अंधार नाही.

[6] जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही जगतो तर आम्ही खोटे बोलत आहोत व सत्याला अनुसरत नाही.

[7] पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.

[8] जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वतःला फसवतो आणि आपल्याठायी सत्य नाही.

[9] जर आपण आपली पापे कबूल करतो, तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.

[10] जर आम्ही म्हणतो की आम्ही पाप केले नाही तर आम्ही त्यास लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्याठायी नाही.

योहानाचे पहिले पत्र — Chapters