Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:58

[1] बंधूंनो, आत्मिक लोकांशी बोलावे तसा मी तुमच्याशी बोलू शकलो नाही. पण त्याऐवजी मला तुमच्याशी दैहिक लोकांसारखे आणि ख्रिस्तामधील बालकांसारखे बोलावे लागले.

[2] मी तुम्हास पिण्यासाठी दूध दिले, जड अन्न दिले नाही कारण तुम्ही जड अन्न खाऊ शकत नव्हता व आतासुद्धा तुम्ही खाऊ शकत नाही.

[3] तुम्ही अजूनसुद्धा दैहिक आहात कारण तुमच्यात मत्सर व भांडणे चालू आहेत, तर तुम्ही दैहिक नाहीत काय व जगातील लोकांसारखे चालत नाही काय?

[4] कारण जेव्हा एक म्हणतो, “मी पौलाचा आहे,” आणि दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोसाचा आहे,” तेव्हा तुम्ही साधारण मानवच आहात की नाही?

[5] तर मग अपुल्लोस कोण आहे? आणि पौल कोण आहे? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत, प्रत्येकाला प्रभूने जे काम नेमून दिले त्याप्रमाणे ते आहेत.

[6] मी बी लावले, अपुल्लोसाने त्यास पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली.

[7] तर मग लावणारा काही नाही किंवा पाणी घालणाराही काही नाही, पण वाढविणारा देव हाच काय तो आहे.

[8] जे बी पेरतात व पाणी घालतात ते एक आहेत आणि प्रत्येकाला आपआपल्या श्रमाप्रमाणे आपआपली मजूरी मिळेल.

[9] कारण अपुल्लोस आणि मी देवाच्या सेवाकार्यात सहकर्मी आहोत. तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात.

[10] देवाच्या कृपेद्वारे जे मला दिले आहे त्याप्रमाणे मी सूज्ञ, कुशल बांधणाऱ्यांप्रमाणे पाया घातला आणि दुसरा त्यावर बांधीत आहे तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करीत आहोत, ह्याविषयी प्रत्येकाने काळजी घ्यावी.

[11] येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया आहे, त्याच्यावाचून इतर कोणीही दुसरा पाया घालू शकत नाही.

[12] जर कोणी त्या पायावर सोने, चांदी, मौल्यवान दगड, लाकूड, गवत किंवा पेंढा यांनी बांधतो,

[13] तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल कारण तो दिवस ते उघडकीस आणील, तो दिवस अग्नीने प्रकट होईल व तोच अग्नी प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा करील.

[14] ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल, त्यास प्रतिफळ मिळेल.

[15] पण एखाद्याचे काम जळून जाईल व त्याचे नुकसान होईल तथापि तो स्वतः तारला जाईल परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल.

[16] तुम्ही देवाचे निवासस्थान आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये निवास करतो हे तुम्हास माहीत नाही काय?

[17] जर कोणी देवाच्या निवासस्थानाचा नाश करतो तर देव त्या व्यक्तीचा नाश करील; कारण देवाचे निवास्थान पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात.

[18] कोणीही स्वतःला फसवू नये, जर कोणी स्वतःला या जगाच्या दृष्टीने ज्ञानी समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी “मूर्ख” व्हावे.

[19] कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे; कारण असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “देव ज्ञान्यांना त्यांच्याच धूर्तपणात धरतो.”

[20] आणि पुन्हा “परमेश्वर जाणतो की, ज्ञान्यांचे विचार व्यर्थ आहेत.”

[21] म्हणून मनुष्यांविषयी कोणीही फुशारकी मारू नये कारण सर्व गोष्टी तुमच्या आहेत.

[22] तर तो पौल किंवा अपुल्लोस किंवा केफा, जग, जीवन किंवा मरण असो, आताच्या गोष्टी असोत अथवा येणाऱ्या गोष्टी असोत, हे सर्व तुमचे आहे.

[23] तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे.

करिंथकरांस पहिले पत्र — Chapters