
Send a text
पांडवांचे स्वर्गारोहण उत्तराखंडमधील माना गावाजवळील 'स्वर्गारोहिणी' पर्वतावरून झाल्याचे मानले जाते. जाता जाता वाटेत मेरू पर्वत लागला. तिथून पुढे निघताना द्रौपदीचे देहावसान झाले. भीमाला तिचा विरह असह्य झाला. त्याने युधिष्ठिराला विचारले, “भ्राता, द्रौपदी तर निर्दोष होती. तरी तिला मरण का आले?” युधिष्ठिर म्हणाला, “भीमा, आपण पाच जण तिचे पती होतो खरे. परंतु, द्रौपदीचे सर्वाधिक प्रेम अर्जुनावर होते. हे एक प्रकारचे पाप तिच्या हातून घडले म्हणून ती इथवरच पोहोचू शकली.” पुढील टप्प्यात सहदेवाने प्राण सोडले. युधिष्ठिर म्हणाला, “सहदेवाला त्याच्या बुद्धिमत्तेचा गर्व झाला होता म्हणून त्याला देहत्याग करावा लागला.” पाठोपाठ नकुलानेही देह ठेवला. तेव्हा युधिष्ठिराने भीमाला सांगितले, “नकुलास आपल्या सौंदर्याचा पोकळ गर्व होता. म्हणून तो मृत्यू पावला.” त्यानंतर अर्जुनाचाही मृत्यू झाला तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, “आपण सर्व योद्ध्यांना एकटेच मारू, अशी प्रतिज्ञा करून अर्जुनाने इतर महान योद्धांचा अपमान केला म्हणून तो मरण पावला.” काही अंतर जाताच भीमावर पाळी आली तेव्हा भीमाने विचारले, “भ्राताश्री, मी काय केले म्हणून मला मरण येत आहे?” युधिष्ठिर म्हणाला, “भीमा, तू माझा अत्यंत लाडका भाऊ! परंतु, तुझ्यातही दोष असा आहे की तुला तुझ्या शक्तीचा अवास्तव अहंकार आहे. शिवाय तू महाखादाड होतास म्हणून तुला मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.”