
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 14th April 2026
देवावरती प्रेम जडले। देवप्रेमे जीवन घडले। जीवनातल्या अनुभवलेल्या आनंदा गातो। आनंदासी घेतो, प्रेमे आनंदासी घेतो ॥
भाऊंच्या घरी नियमीत येत असलेल्या अन्य काही मंडळींचा उल्लेख मागल्या एपिसोडमध्ये अनावधानाने करायचा राहून गेला. सत्यविजय रेवाळे , प्रमोद , शारदाताई ,वीणा ठाकरे परिवार , अंजली , मधुरा कुलकर्णी ही मंडळी सुध्दा येत असत . पुढे पुढे सौरभ , मुद्रा , वंदनाजी कपूर सुध्दा यायला लागले . शहापूरची मंडळीही काही दिवस येत होती. हा परमानंद प्रभूंच्या प्रेमाचा गोतावळा होता. भाऊ व सरोजवहिनी अत्यंत प्रेमाने सर्वांचे स्वागत करत असत .
बरोबर 7.00 वाजता प्रभूंच्या जयजयकाराने कार्यक्रमाला सुरुवात होत असे. प्रभूंच्या प्रतिमेला व पादुकांना भाऊंनी पुष्पहार घालून वंदन केल्यावर स्तोत्रगायन होत असे. भाऊ सर्वांनाच सामावून घेत असत. दोघा तिघांना पदगायनाची संधी मिळत असे. पदगायनाची सांगता मात्र नेहमी सत्यविजय रेवाळ्यांच्या गोड आवाजात होत असे. त्यानंतर एखाद्या प्रेमीभक्ताचे भावपूर्ण मनोगत. हा सगळा क्रम ठरलेला असायचा.
प्रभूंचे माहात्म्य माझ्या ह्रदयात ठसण्यामध्ये या प्रेमीभक्तांच्या प्रकटीकरणाचे फार मोठे योगदान आहे. प्रेमाने रंगलेल्या भाविकांचा थोडासा रंग मलाही लागलाच . विषय तो एकच नारायण. इथे आदानप्रदान विचारांचे नव्हते तर प्रभूंविषयीच्या प्रत्येक प्रेमीभक्ताच्या भावाचे व प्रेमाचे होते .
भाऊंचे निरूपण म्हणजे षडरस भोजनाची मेजवानीच. समर्पित जीवनाचा अद्भूत आविष्कार. विविध प्रभूप्रेमरंगांनी फुललेले व विस्तारलेले कारंजे ज्याचे मूळ भाऊंच्या अंतःकरणात होते . त्या कारंजाचे तुषार माझ्याही अंगावर पडायचे हा एक आनंददायी अनुभव होता. प्रभू हाच एकमेव विषय पण तो दरवेळेस नित्य नाविन्याने प्रकट व्हायचा. प्रभूंचा प्रदीर्घ सहवास, प्रत्येक बर्यावाईट प्रसंगात प्रभूंना दिलेली साथ , प्रभूंवरील असीम श्रध्दा , निष्ठा व सर्वांगाने असलेले प्रेम व या सर्व गुणधर्मातून उद्भावलेले प्रभूमय जीवन भाऊंच्या शब्दा शब्दातून उलगडत असे. भाऊंकडून प्रकट होत असलेले प्रभूमाहात्म्य माझ्या उमेदवारीच्या काळात मला प्रेरणादायी ठरत होते . म्हणूनच त्या काळात अनुभवलेल्या आनंदाचे गायन आजही माझ्याकडून होत आहे . आनंदासी घेतो , प्रेमे ... श्रीपरमानंदार्पणमस्तु