
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 10th March 2026
भक्ताचिया अंतरात देवाचे ते दर्शन। भक्तासी करीतसे भक्तिमार्गदर्शन । परमानंद सुदर्शन नित्य अनुभवलो। देवा तुझ्या दर्शनाला प्रेमाने मी आलो ॥ चहापान झाल्यावर संवाद पुन्हा सुरु झाला . " कर्मकांडात अडकलेल्या मनाची पायपीट होते प्रवास होत नाही. घाण्याला जुंपलेला बैल मालकाला तेल देतो पण त्याला चरायला मात्र कडबाच मिळतो. संसारात खर्च केलेली अतिरिक्त उर्जा व्यर्थ जाते. समाधान कोणालाच मिळत नाही. कारण समाधान संसारभावात नाही तर भक्तिभावात आहे. पूर्वायुष्यातील संस्कार एका ठराविक मर्यादेपर्यंतच उपयुक्त ठरतात. प्रापंचिक जीवन प्रारब्धाधीन असल्यामुळे सुखदुःखाचे हिंदोळे आहेत. प्रारब्धावर मात करता येत नाही पण ईश्वराधीन जीवन प्रारब्धाला आपल्यामध्ये सामावून घेते व मनाला चिंतामुक्त करते. मनाला ईश्वराधीन करावे कसे या प्रश्नाचा शोध घ्यायला एखादा जीव जेव्हा संसारभावातून बाहेर पडतो तेव्हा भाग्याने त्याला त्याचा देव सद्गुरूरुपाने भेटतो. मनोविजय ग्रंथात म्हटल्याप्रमाणे मतिमंद आता साधनायोग्य होतात . सत्य जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होते. आनंदाचा मार्ग सद्गुरूंच्या अंतःकरणातून जातो याची जाणीव होते व त्यांच्या मार्गदर्शनाने भक्तिमार्गावर मार्गक्रमण करण्याचा निश्चय बळावतो. तुमचे संस्कार तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलेत आता त्या संस्कारांना मागे ठेवून शाश्वताकडे नेणारी पुढची वाटचाल करायची आहे ." प्रभूंची नजर माझ्यावर स्थिरावली. आता नजरेतून मुकसंवाद सुरू झाला होता. ती नजर , ते मौन शब्दांपेक्षा अधिक प्रभावी ठरत होते. प्रभू आता स्वानंदात रममाण झाले होते व मला काय बोलावे ते सुचत नव्हते . माहौल शांततेचा होता व माझे मनही शांत झाले होते . असा कितीतरी वेळ गेला . शेवटी प्रभूच त्या शांततेचा भंग करत हलक्या फुलक्या स्वरात व मोकळेपणाने हसत म्हणाले , " अरे , आज तुमचा वाढदिवस ना ? तुम्ही पार्टी तर द्यायलाच हवी." माझ्या मनावरील दडपण एकदम कमी झाले व आम्ही सर्वजण
हसत खेळत हाॅटेलला जाण्यासाठी बाहेर पडलो. जेवण झाल्यावर टिकूजी-नी-वाडीत प्रभूंशी झालेला संवादाचे मनन व चिंतन करीतच मी घरी परतलो . आजही त्या संवादातून प्रभूंनी दिलेला संदेश माझ्या मनात घर करून आहे , टिकून आहे . देवा तुझ्या दर्शनाला ... श्रीपरमानंदार्पणमस्तु