Episode 485 as on 27th February 2026
27 February 2026

Episode 485 as on 27th February 2026

Guru Shishya Sukhsamwad

About

Guru Shishya Sukhanandsamwad as on 27th February 2026

भक्ताला देवाचा तो प्रेमगुण लागू दे। देवप्रेमे जीवनची सर्व  अंगे रंगू दे। परमानंद अनुभव नित्य उपभोगू दे । देवा तुझ्या प्रेमाचा तो गुण मज घेऊ दे ॥ त्या दिवसांमध्ये रविवारी सकाळीही प्रेमीजन दत्तपीठात प्रभूंना भेटायला जात असत. मीही रविवारची सकाळ सहसा चुकवत नसे. संध्याकाळी प्रभूंचे निरूपण असायचे. अशाच एका रविवारी सकाळी मी दत्तपीठात गेलो होतो. त्या दिवशी , रत्नाकर पुराणिक , माझ्या मामेभावाला तिथे पाहून मला आश्चर्यच वाटले. मी त्याला त्यापूर्वी कधीच दत्तपीठात पाहिले नव्हते किंवा आमच्या बोलण्यामध्ये दत्तपीठाचा विषय कधीच आला नव्हता. मी तिथे पोहचलो तेव्हा तो प्रभूंशीच बोलत होता. त्याच्या आईचे म्हणजे माझ्या मामींचे , वसुंधरादेवींचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्या प्रभूंच्या भक्त होत्या. पण मी प्रभूंकडे जायला लागल्यापासून आमची कधीच गाठ पडली नव्हती.  त्यांनी प्रभूंच्या चरणी विलीन होण्यापूर्वी प्रभूंच्या नावाने काही रकमेचा चेक तयार केला होता व आपल्या पश्चात प्रभूंनी त्याचा स्वीकार करावा अशी प्रभूंना प्रार्थना करणारी चिठ्ठी लिहून ठेवली होती . तो चेक देण्याकरताच रत्नाकर प्रभूंना भेटायला आला होता . आता प्रभू कधीच कोणाकडून धनाचा स्वीकार करत नाहीत हे मला एव्हाना माहीत झाले होते. म्हणून प्रभू चेक स्वीकार करणार नाहीत असा माझा अंदाज होता. पण प्रियजनांचे अंदाज खरे ठरवतील ते प्रभू कसले. त्यांनी तो चेक हातात घेतला. शांतपणे कपाटातून आपले चेक बुक काढले, वसुंधरादेवींनी अर्पित केलेल्या रकमेचे दोन समान भाग करून त्यांच्या दोन्ही सुनांच्या नावाने दोन चेक तयार केले व ते रत्नाकरच्या स्वाधीन केले . प्रभूंची  निस्पृहता माझ्या अंतःकरणाला खोलवर स्पर्श करून गेली. निस्पृहतेचा परिचय देताना प्रभूंनी   धनाचा नाही तर भक्ताच्या अंतिम इच्छेचा स्वीकार केला होता, मान ठेवला होता. ' मूल्य धनाचे काय मुनीजना अवघ्या आशा श्रीरामार्पण ' धनाचे नाही पण भक्ताच्या भावाचे मूल्य मात्र प्रभू जाणून आहेत . प्रभूंच्या या अशाच छोट्या छोट्या कृतींमुळे दत्तपीठात माझे मन संस्कारक्षम बनत गेले . भक्ताला देवाचा तो प्रेमगुण लागू दे . देवा तुझ्या प्रेमाचा तो... श्रीपरमानंदार्पणमस्तु